नाशिक : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी हा पुरस्कार शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने पटकावला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे संचालक सचिन सावंत, संचालिका माधुरी सावंत यांनी पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार अभिजीत पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे महासंचालक शेखर गायकवाड, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डेक्कन शुगरचे अध्यक्ष सोहम शिरगावकर, डेक्कन शुगरचे माजी अध्यक्ष एस. डी. भड उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना द्वारकाधीश साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत म्हणाले की, साखर उद्योगातील मानाचा पुरस्कार मिळणे कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. कारखान्याने सर्वच क्षेत्रात चांगले काम केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी द्वारकाधीश साखर कारखान्याने विविध निषकांमध्ये चांगली कामगिरी केल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कारखान्याने उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, विविध ऊस विकास योजना, कारखाना व आसवानीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊस उत्पादकांना नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत एफआरपी देण्याचे धोरण, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार, कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, पर्यावरणाचे संगोपन आदी उपक्रम राबवले. त्याची दखल घेत हा पुरस्कार मिळाला आहे.