नाशिक : शेवरे (ता. बागलाण) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने २०२४-२५ या वर्षात सर्व क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल घेऊन भारतीय शुगरने कारखान्यास “बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मर्स मॅनेजमेंट” हा पुरस्कार जाहीर केला आहे. संस्थेचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांना पुरस्काराबाबत पत्राद्वारे कळविले आहे . १८ जुलैला कोल्हापूर येथे भारतीय शुगरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत द्वारकाधीश कारखान्यास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत म्हणाले की, द्वारकाधीश साखर कारखान्याचे उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, कारखाना राबवीत असलेल्या विविध ऊस विकास योजना, कारखाना व आसवानी मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊस उत्पादकांना एफ.आर.पी. नियमाप्रमाणे १४ दिवसाच्या आत मोबदला अदा करण्याचे धोरण, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार इत्यादींची दखल करून भारतीय शुगर या संस्थेने हा मानाचा पुरस्कार कारखान्यात जाहीर केला आहे. कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत यांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.