नाशिक : भारतीय शुगर संस्थेने शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने २०२४-२५ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची दखल घेऊन कारखान्यास बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मर्स -मॅनेजमेंट हा पुरस्कार प्रदान केला. कोल्हापूर येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. टी. भालेराव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, संचालक कैलास सावंत कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पुरस्काराबद्दल द्वारकाधीश कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत म्हणाले की, उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या विविध ऊस विकास योजनेत सहभागी होऊन जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन चा वापर करून एकरी शंभर मेट्रिक टनाच्या पुढे दर्जेदार उसाचे उत्पन्न घेऊन आर्थिक विकास साधावा. तर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत म्हणाले, द्वारकाधीश साखर कारखान्याचे उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, कारखाना राबवीत असलेल्या विविध ऊस विकास योजना, कारखाना व आसवानीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे १४ दिवसांत मोबदला अदा करण्याचे धोरण, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आदींची दखल घेऊन भारतीय शुगरने हा पुरस्कार दिला आहे.