नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्यावर शासनाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाच्यावतीने वजनकाट्यांची तपासणी केली. विशेष लेखापरीक्षक संतोष वाघचौरे, वैधमापन शास्त्र निरीक्षक भगवान डोलारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव आणि मंडळ अधिकारी लिलके यांच्या पथकाने कारखान्यातील तिन्ही ऊस वजन काटे तपासले. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रक यांचे प्रत्यक्ष वजन करून पडताळणी करण्यात आली. सर्व काट्यांवर मोजमाप अचूक असल्याचे पथकाने नमूद केले. कारखान्याकडून सभासद ऊस उत्पादकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काट्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते आणि योग्य वजन देण्याची काटेकोर दक्षता घेतली जाते, असे कादवा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सांगितले.
राज्यात सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून काही साखर कारखान्यांच्या वजन काट्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे. या पथकाकडून राज्यभर काट्यांची तपासणी सुरू आहे. तशीच पाहणी जिल्ह्यात करण्यात आली. याबाबत कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटये यांनी सांगितले की, जिल्ह्यात कादवा कारखान्याचा साखर उतारा अव्वल राहत असून त्यानुसार एफआरपी अदा केली जात आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करत कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे सांगितले.


















