नाशिक : कादवा सहकारी साखर कारखान्याने कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्याच्या उद्दिष्टांतून कारखाना प्रशासन नियोजन करत आहे. कारखान्याच्या भवितव्यासाठी अधिक ऊस गाळप करणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात ऊस टोळ्या वाढविण्यात येत असून उसतोडीचेही नियोजन करण्यात आले आहे. ऊसतोड कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू आहे. मार्चअखेर सर्व ऊसतोड पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालू गळीत हंगामात केवळ ३५ दिवसांत एक लाख १४१ टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
एक नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने तब्बल एक लाख चार हजार ५७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या काळात १०.४३ टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याच्या सिडफार्ममध्ये उसाच्या विविध जातीचे रोपे शेतकऱ्यांचे मागणीनुसार बनविण्यात येत आहेत. उधारीने रोपांचे वाटप करण्यात येत आहे. कंपोस्ट खतनिर्मितीही करण्यात आली असून उधारीने खत विक्री सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची तोड पूर्ण क्षमतेने केली जाईल, शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, कोणतेही नुकसान होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.


















