नाशिक : केजीएस साखर कारखान्यातर्फे आयोजित ‘साखर कारखाना आपले दारी’ अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोंदेगाव येथे आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांना ऊस लागवड, व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. जैन इरिगेशनचे सुरेश मगदूल, माती परीक्षण प्रयोगशाळेचे धनंजय खालकर आणि कारखान्याचे संचालक किशोर होळकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना रुंद सरी पद्धत, माती परीक्षणाचे महत्त्व, योग्य ऊस जातींची निवड, पाणी व खत व्यवस्थापन तसेच पक्वता या विषयांवर माहिती दिली. माती परीक्षणामुळे जमिनीची अचूक स्थिती समजते व खतांचा योग्य वापर करता येतो, असे खालकर यांनी सांगितले. ठिबक सिंचन, रुंद सरी आणि नैसर्गिक घटकांचा योग्य वापर केल्यास एकरी १०० मेट्रिक टन उत्पादन शक्य असल्याचे होळकर यांनी नमूद केले. नियोजनबद्ध तोडणी करून सर्व ऊस कारखान्यात नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले


















