नाशिक : रानवड साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची केंद्र सरकारमार्फत चौकशी व्हावी, सभासदांचे थकित पैसे वसूल करून कारखाना पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यावा यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नाशिक येथे खासदार संजय राऊत यांना दिले. जनआक्रोश मोर्चासाठी नाशिकला आलेल्या संजय राऊत यांना शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, नितीन निकम, किरण वाघ, योगेश आढाव यांनी भेटून केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घडवून देण्याची विनंती केली.
बोडके-पाटील यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्यावतीने निफाड व रानवड साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती देत निवेदनही दिले. रानवड साखर कारखाना आमदार दिलीप बनकर यांच्या पतसंस्थेने अजित पवार यांच्या राजाश्रयाने बेकायदेशीररीत्या चालविण्यास घेतला होता. मात्र त्यांनी गाळप हंगाम बंद ठेवला. कारखान्याच्या भाड्यापोटी थकलेले १२ कोटी रुपये अवसायक यांच्याकडे न भरता सत्तेचा दुरुपयोग केला. कारखान्याची फेरनिविदा काढण्यात आली. कारखान्यातून तब्बल पाच कोटी रुपयांचे भंगारही लांबविण्यात आले आहे. मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. केंद्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, नितीन निकम, किरण वाघ, योगेश आढाव आदी उपस्थित होते.