नाशिक : निफाड सहकारी साखर कारखान्याची १२७ एकर जमीन, मालमत्ता विक्री थांबवा, भाडेपट्टा कराराचा पुन्हा विचार करून पुनर्रचना करा, भाडेपट्ट्याने दिलेला कारखाना त्वरित सुरू करण्यात यावा, भाडेपट्टा करार, कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करा, कामगारांची ८१ कोटी ९४ लाखांची देणी त्वरित मिळावी आणि दुरुस्तीच्या नावाने विकलेल्या सामग्रीची चौकशी करावी अशा विविध मागण्या करत ‘निसाका’ संघर्ष समिती व सभासद, कामगारांनी निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
निफाडचे माजी आमदार अनिल पाटील-कदम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देण्यात आले. शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. हातात फलक घेत मोर्चेकऱ्यांनी निसाकाची यंत्रसामग्री चोरणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, निसाका जमीन विक्री प्रक्रिया त्वरित रद्द करा अशा घोषणा देत मोर्चा जळगाव फाट्यावरून सुरू होऊन तहसील कार्यालय प्रांगणात आल्यानंतर तेथे सभेत रूपांतर झाले.
सचिन वाघ, शिवसेना तालुकाप्रमुख खंड बोडके पाटील, बी.जी पाटील, प्रमोद गडाख, धोंडिराम रायते, अर्जुन बोराडे यांनी मोर्चाला मार्गदर्शन करत निसाका संघर्षांची वज्रमूठ यापुढेही तेवत ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी अनिल कदम यांनी निसाका हा कर्मवीरांच्या त्याग आणि सभासदांच्या कष्टातून उभा राहिला आहे. त्यामुळे हा कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे यासाठी कामगार, शेतकऱ्यांनी पोटतिडकीने हा उभा केलेला लढा यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा जिल्हा बँक व सरकारला दिला. निफाडचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.