नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना विक्रीस कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने कारखाना मालमत्ता विक्री प्रक्रियेस स्थगिती द्यावी व अन्य पर्याय स्वीकारण्यास राज्य सहकारी बँकेस निर्देश द्यावेत अशी जनहित विनंती याचिका नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कर्ज वसुली प्राधिकरणाने (डीआरटी न्यायालय) मान्य करून राज्य विक्री प्रक्रिया रद्द केली आहे. कारखाना बचाव समितीचे निमंत्रक सुनील देवरे यांनी ही माहिती दिली. याबाबत राज्य सहकारी बँकेस आराखडा तयार करून बँकेने प्राधिकारांकडून मंजुरी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. समितीने ॲड. विलास देशमाने यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. या निर्णयाची पुढील कार्यवाही राज्य सहकारी बँकेला करावी लागणार आहे. तशी विनंती शासनास करणार असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले.
निमंत्रक सुनील देवरे यांनी सांगितले की, वसाका कारखाना मालमत्ता महाराष्ट्र राज्य सह. बँकेने जप्त करून आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. अपूर्ण सुरक्षाव्यवस्था असल्याने येथे लहान-मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. राज्य सह. बँक प्रशासन गंभीर नसल्याने कारखाना बंद अवस्थेत असल्याचा मुद्दा जनहित याचिकेत करण्यात आला. बँकेने पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश होण्याची अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव तालुक्याचे कार्यक्षेत्र व अर्थकारण असलेल्या या कारखान्याकडील थकीत कर्ज वसलीसाठी सह. बँकेने मालमत्ता जप्त केली. कारखाना २०२३ पासून बंद अवस्थेत असताना कारखान्यात तब्बल तीन वेळा चोरीच्या घटना आहेत. कारखाना विक्रीसाठी दोनवेळा प्रक्रिया करूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, ही बाब याचिकेत निदर्शनास आणून देत पुरावे देण्यात आले.

















