नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून बंद असलेला देवळा येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) परत सुरू व्हावा, कामगारांचे थकीत वेतन मिळावे आदी मागण्यांसाठी कारखान्यातील आजी-माजी कामगारांनी शुक्रवारी देवळा पाच कंदील येथे शिव स्मारकाजवळ आंदोलन केले. यावेळी लोकप्रतिनिधी व शिखर बँकेच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यात आला, तर काही कर्मचाऱ्यांनी मुंडण करत तीव्र भावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक तथा वसाका मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले. जमीनधारक कर्मचारी शशिकांत पवार, दोधा पवार आदींनी मुंडण करत निषेध नोंदवला.
कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन तास धरणे आंदोलन केले. कामगारांची रोजीरोटी बुडाली असून आहे. कामगारांना प्रॉव्हिडंट फंड मिळावा, पेन्शन लागू करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या. धाराशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी निवृत्त कामगारांनी केली. आंदोलनात वसाका वसाहतीमधील मनीषा पवार, उषा मोहिते, संगीता गुंजाळ, मनीषा पवार, ललिता पवार यांच्यासह मुन्ना शिंदे, बापू देवरे, नाना पवार, समाधान निकम, सुनील देवरे, आनंद गुंजाळ, त्र्यंबक पवार, रामा पवार, समाधान गायकवाड, रणधीर पगार, रमेश पवार आदी सहभागी झाले होते.