नॅचरल शुगर्सकडून उसाला प्रती टन ३,०१० रुपयांचा उच्चांकी अंतिम दर : अध्यक्ष बी. बी. ठोंबरे

धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर युनिट क्रमांक एकने २०२४-२५ या हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन ३,०१० रुपये अंतिम ऊस दर जाहीर केला. कारखान्याचा संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याची माहिती नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी दिली. कारखान्याने दिलेला हा दर मराठवाड्यातील उच्चांकी असल्याची माहिती त्यांनी दिली. कारखान्याने हंगाम २०२४- २५ मध्ये ४.७१ लाख टन ऊस गाळप केला. या गाळपास आलेल्या उसासाठी पहिला हप्ता २,७०० रुपयांप्रमाणे ऊस पुरवठादारांना दिलेला आहे. उर्वरित रक्कम ३१० रुपयांचा दुसरा व अंतिम हप्ता ३१ मे रोजी संबंधित शेतकऱ्यांच्या एनसाई मल्टिस्टेट व श्री साई पतसंस्थेच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, असेही ठोंबरे यांनी सांगितले.

अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगरने सदैव मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त दर देण्याचा पायंडा कायम ठेवला आहे. गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये गाळपास आलेल्या उसासाठी तीन हजार १० रुपये दर देण्याचे निश्चित केले आहे. नॅचरल उद्योगाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सदैव जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा व शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थैर्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व पाऊस अत्यंत समाधानकारक झाल्यामुळे ऊस पिकाचे खत व्यवस्थापन व मशागतीसाठी ऊस बिलाचा अंतिम हप्ता अदा करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here