कोल्हापूर : दौलत साखर कारखान्याला एनसीडीसीने मशिनरी, इमारत व जागेची विक्री करून थकीत कर्ज फेडण्यासंदर्भात नोटीस बजावल्याने अथर्व प्रशासनाने तासगावकर काळातील २०१०-११ ची थकीत एफआरपी देण्याची प्रक्रिया थांबविली आहे. इतकी जोखीम घेऊनही ती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही शेतकऱ्यांना रक्कमही वर्ग केली आहे. अशात एफआरपी व्याजासह मिळावी यासाठी तहसीलदार, प्रादेशिक साखर सहउपसंचालक यांच्या माध्यमातून दबाव टाकला जातोय. त्यामुळे आता हा कारखाना आपल्याकडे राहील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच थांबवत असल्याचे ‘अथर्व’चे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची तासगावकर काळातील एफआरपी देण्याची जबाबदारी आपण घेतली असून, त्याचे व्याज देण्यास बांधील नाही. तरीदेखील वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. त्यातच काही लोकांकडून जाणीवपूर्वक कारखान्याच्या कारभारात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कारखाना कंपनीच्या ताब्यात राहणार की नाही याचीच शाश्वती नसेल, तर थकीत एफआरपीची जबाबदारी का घ्यायची, असा सवाल खोराटे यांनी उपस्थित केला. त्यामुळे यासंदर्भात कागदपत्रांची पडताळणी तत्काळ थांबवत असल्याचे अथर्व कंपनीचे अध्यक्ष खोराटे यांनी जाहीर केले.