पुणे : नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ऊस बिले ३१०१ रुपये प्रती टन याप्रमाणे राज्यात सर्वप्रथम अदा केली आहेत. याबद्दल शहाजीनगर येथे कारखान्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशातील साखर कारखान्यांचे हंगामातील ऊस गाळपाचे दिवस अलीकडच्या काळात कमी होत चालले आहेत. यामुळे साखर उद्योगांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (NFCSF) अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने ५२५६५७ टन उसाचे गाळप केले. यात उसाच्या २६५ वाणाचे प्रमाण ८५ टक्के तर को. ८६०३२ वाणाचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. या हंगामामध्ये अधिकचे ऊस गाळप होईल असे नियोजन होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गाळप झाले. आगामी ऊस तोडणी प्रोग्रॅम काटेकोरपणे राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत कारखान्याकडे उसाच्या नोंदी द्याव्यात. यावेळी कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे यांनी मनोगते व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील, बाबूराव रणवरे, अनिल पाटील, दत्तू सवासे, दत्तात्रेय शिर्के, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


















