देशाच्या पहिल्या सहकार विद्यापीठाद्वारे घराणेशाहीला आळा बसेल : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

आणंद (गुजरात ) : गुजरातमध्ये स्थापन होत असलेल्या देशाच्या पहिल्या सहकार विद्यापीठाद्वारे घराणेशाहीला आळा बसेल. भविष्यात या क्षेत्रात फक्त पात्र आणि प्रशिक्षित व्यक्तींनाच नोकऱ्या मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी शनिवारी केले.

त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या पायाभरणीनंतर आणंद कृषी विद्यापीठात जल आणि भू व्यवस्थापन संस्थेच्या आवारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या विद्यापीठाला भारतातील सहकारी चळवळीतील अग्रणी आणि ‘अमूल’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्व. त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ १२५ एकर जमिनीवर ५०० कोटी रुपये खर्चुन बांधण्यात येणार आहे.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, या नव्या विद्यापीठाद्वारे सहकारी क्षेत्रातील घराणेशाही संपेल. या क्षेत्रातील पुढील पिढ्या कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय, पार्श्वभूमीशिवाय या क्षेत्रात येतात. आधी प्रथम नोकरी आणि नंतर प्रशिक्षण दिले जात आहे, आता असे होणार नाही. पूर्वप्रशिक्षित उमेदवारांचीच नियुक्ती केली जाईल. सहकार क्षेत्रातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न हे सहकार विद्यापीठ करील. प्रशिक्षण देऊन उमेदवार तयार केले जातील आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

भारतीय सहकारी क्षेत्र प्रतिभेच्या बाबतीत कधीही मागे नव्हते. आज देशाला योग्य प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते, क्षेत्रतज्ज्ञ आणि व्यावसायिक प्रशासकीय अधिकारी यांचीच आवश्यकता आहे. त्रिभुवन पटेल यांनी सहकार क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांचेच नाव या विद्यापीठाला देणे योग्य ठरेल. येत्या काळात हे विद्यापीठ देशातील एक अग्रणी विद्यापीठ होईल, यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here