नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे २०२३-२४ मधील विविध पुरस्कारांचे गुरुवारी वितरण झाले. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते विघ्नहर सहकारी कारखान्याला उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाचा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार तर भीमाशंकर साखर कारखान्याला ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ पुरस्कार देण्यात आला. तर सोमेश्वर साखर कारखान्याला साखर, वीज, इथेनॉल, अर्थकारण अशा सर्वच बाबींमध्ये देशात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री निमुबेन बांधनिया, माजी केंदीयमंत्री सुरेश प्रभू, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.
ऊस विकासात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, संचालक व अधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. तर अधिकतम गाळपाबद्दलचा पुरस्कार पारगाव भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण २९ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर राष्ट्रीय पातळीवरही दादा ठरला आहे, असे ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. पुस्कार स्वीकारताना उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. संचालक राजवर्धन शिंदे, बाळासाहेब कामथे, विश्वास जगताप, आनंदकुमार होळकर, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, शांताराम कापरे, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, रणजित मोरे, तुषार माहूरकर, संपत गावडे उपस्थित होते.