कोल्हापूर : पूर्व भागातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेल्या एफआरपीमध्ये वाढ करीत आणखी १०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता वाढीव दर एकूण ३५०० रुपये जाहीर केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या कारखान्यांबाबत नमते धोरण घेत ऊसतोडणी सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवला. शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्याने गुरुवारी रात्री ३४०० रुपये पहिला हप्ता व उर्वरित शंभर रुपये हंगाम संपल्यानंतर असा फॉर्म्युला देत कोंडी सोडवली. यानंतर टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त साखर कारखान्याने हाच फॉर्म्युला कायम ठेवला. आम्हीही असाच दर देत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांनी सांगितले.
या कारखान्यांकडून समाधानकारक दर मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याबाबतचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. ज्या कारखान्यांची एफआरपी ३४०० रुपयांच्या आत बसते, त्यांनी ३४०० अधिक १०० रुपये नंतर द्यावेत. ज्यांची एफआरपी ३५०० च्या पुढे बसते त्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये द्यावेत, या फार्म्युलाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्यता दिली आहे. ज्या कारखान्यांना हा फॉर्म्युला मान्य नाही त्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील असे स्वाभिमानीने स्पष्ट केले.
…अन्य संघटनांचा विरोध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तडजोडीची भूमिका घेतली असली तरी जय शिवराय किसान संघटना, शेतकरी सेना, महाराष्ट्र, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना बळीराजा संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, किसान मोर्चा, सीपीआय कोल्हापूर, अखिल भारतीय मराठा महासंघ, रयत संघटना आदी संघटनांनी या फॉर्म्युलाला विरोध दर्शवून ठिय्या आंदोलन कायम ठेवले आहे.
