कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांचा हंगाम संपला असून, दोन कोटी नऊ लाख टन उसाचे गाळप केले आहे. विभागात केवळ ९ साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी अदा केली असून, २९ साखर कारखान्यांची १०५४ कोटी १९ लाख रुपये इतकी एफआरपी थकीत आहे. यामुळे प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी विभागातील २९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली असून, आज (१० मार्च) यावर सुनावणी होणार आहे.
कोल्हापूर विभागात ३९ साखर कारखान्यांनी हंगाम घेऊन दोन कोटी नऊ लाख ८६ हजार १४२ टन उसाचे गाळप केले आहे. साखर उत्पादन दोन कोटी ३१ लाख ७१६५ लाख क्विंटल मिळाले आहे. विभागाचा निव्वळ साखर उतारा ११.०१ टक्के राहिला आहे. दरम्यान, जानेवारीपासून काही साखर कारखान्यांची उसाची बिले थकविली आहेत. नियमानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत उसाची बिले देणे अपेक्षित होते. मात्र, विभागात मोठ्या प्रमाणात एफआरपी थकीत राहिली आहे. ९ साखर कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी दिली आहे. तर विभागातून २९ साखर कारखान्यांकडे १०५४ कोटी १९ लाख रुपये एफआरपी थकीत राहिली आहे.
यामुळे साखर सहसंचालकांनी विभागातील २९ साखर कारखान्यांना थकीत एफआरपीबाबत नोटीस बजावली असून, १० मार्च रोजी यावर सुनावणी होणार आहे. यानंतरही उसाची बिले न दिल्यास साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई होऊन व्याजासह बिले द्यावी लागणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी दिली आहे. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना प्रादेशिक सहसंचालक (साखर) संगीता डोंगरे म्हणाल्या कि, थकीत एफआरपी वसूल करण्याकरिता २९ साखर कारखान्यांना नोटीस बजावली असून, मंगळवारी सुनावणी होणार आहे. साखर आयुक्त कार्यालय यांनी सुनावणी घेऊन आरआरसी प्रस्तावित करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले आहे.


















