सीतापूर : शेतकरी दरवेळी साखर कारखान्याला वेळेवर ऊस देतात, मात्र त्यांना ऊस बील वेळेत मिळत नाही. ऊस कारखान्याला पाठविल्यानंतर नियमाप्रमाणे १४ दिवसाच्या आत बिले देण्याची मागणी केली. याबाबत ऊस व साखर खात्याचे मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांच्यासमोर शेतकऱ्यांनी कैफियत मांडली. त्यावर शेतकऱ्यांना दर आठवड्याला ऊस बिले दिली जातील, असे आश्वासन मंत्री चौधरी यांनी दिले. मंत्री चौधरी यांनी लखनौ आणि बरेली विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. साखर कारखाने वेळेवर सुरू करावेत आणि शेतकऱ्यांची प्रलंबित देणी वेळेवर द्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
चालू गळीत हंगामासाठी केलेल्या ऊस लागवड क्षेत्र सर्वेक्षणावरील आक्षेपांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी म्हणाले की, उसाचे वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी. आमदार ग्यान तिवारी आणि आमदार निर्मल वर्मा यांच्या मागणीवरून त्यांनी बिस्वान आणि महमुदाबादच्या साखर कारखान्यांची क्षमता विस्तार आणि नवीन खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत आवश्यक त्या कार्यवाहीच्या सूचना केल्या.
गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी संशोधन केंद्रातील कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत असे निर्देश मंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांना प्रगत उत्पादन तंत्र, सुधारित बियाणे, पिकावरील रोग व त्यांचे प्रतिबंध याबाबत माहिती द्यावी. ऊस खरेदी समित्यांचे बळकटीकरण करून नवीन इमारतींच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीत जिल्हाधिकारी अनुज सिंह, बरेलीचे ऊस उपायुक्त राजीव राय, लखनौचे ऊस उपायुक्त सत्येंद्र सिंह, सीतापूरचे ऊस अधिकारी रत्नेश्वर त्रिपाठी, पिलीभीतचे अधिकारी खुशीराम, हरदोईच्या अधिकारी निधी गुप्ता, रायबरेलीचे संजय कुमार उपस्थित होते.















