भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी तीन औद्योगिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि १,२१८ कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीच्या १०इतर प्रकल्पांचे भूमीपूजन केले. धारसुगडा जिल्ह्यात धान्यावर आधारित डिस्टिलरी प्लांट (२०४.६० कोटी रुपये), पुरी येथे एक पंचतारांकित हॉटेल आणि लक्झरी रिसॉर्ट (१३५.६९ कोटी रुपये), कटक येथे चार तारांकित हॉटेल (७७.०४ कोटी रुपये) आणि संबलपूरमध्ये इथेनॉल प्लांट (१०३ कोटी रुपये) यांचे भूमीपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितले की, ओडिशा राज्य धातू आणि खनिजापासून खाद्य प्रक्रियेपर्यंतच्या विविध क्षेत्रात प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत आहे. उद्योगांशी राज्यांचे संबंध आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी फलदायी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी खुर्दामध्ये मेफेअर हॉटेल्स अॅंड रिसॉर्ट्स लिमिटेडकडून ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या एका कन्व्हेन्शन सेंटरसाठी कोनशिला बसविली.

















