कोल्हापूर, ता. 4 : यावर्षीच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर मिळावा यासाठी 24 ऑक्टोबरला रयत संघटनेच्यावतीने ऊस परिषद घेतली जाणार आहे. या ऊस परिषदेला आमदार, खासदार तसेच जिल्हा परिषद सदस्यांसह इतर पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे. हे सर्व लोकप्रतिनिधी या ऊस परिषदेला उपस्थित राहतील, अशी माहिती राज्याचे कृषी व पणनराज्यमंत्री आणि रयत संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज दिली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री खोत म्हणाले, गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात एफआरपी अधिक 300 रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एफआरपी अधिक दोनशे रुपये दिले आहेत. आता उर्वरितही पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला किती दर असावा याबाबतचा निर्णय ऊस परिषदेत घेतली जाणार असल्याचेही श्री खोत यांनी सांगितले. कोणतेही आंदोलन करून प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन न करता चर्चेने प्रश्न सोडविण्याचाच आपला प्रयत्न आहे. दरम्यान, ऊस परिषदेमध्ये जो निर्णय होईल, त्या निर्णयाशी आपण बांधिल असू असेही खोत यांनी सांगितले.












