सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथील सभेत ‘काटा मारणारे साखर कारखाने मी शोधून काढले आहेत; त्यांना मी दाखवणार आहे,’ असा इशारा दिला, यावर टोला लगावताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी “काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादी व पुरावे मी यापूर्वीच त्यांच्याकडे दिले होते. पण तेच कारखानदार आज भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता कारवाईचे धाडस दाखवावे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
मराठवाड्यातील परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर सोलापूर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. राज्यात जे साखर कारखाने वजनकाट्यात फेरफार करतात, रिकव्हरी कमी दाखवतात, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. सर्व कारखान्यांचे वजनकाटे व रिकव्हरी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे धाडस सरकारने दाखवावे. तेव्हाच शेतकरी हिताचे प्रत्यक्ष रक्षण होईल,” असेही ते म्हणाले.
शेट्टी म्हणाले, की अतिवृष्टिग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दृश्य विदारक आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतीत पाच ते सहा फूट माती वाहून गेली किंवा काही ठिकाणी पाच फुटांपर्यंत भराव आला. विहिरी, जनावरे आणि गोठे वाहून गेले आहेत. मात्र सरकार तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असतानाही महसूल आणि जलसंपदा विभागात समन्वय नसल्याने सीना नदीला पूर आला. हा पूर पूर्णपणे मानवनिर्मित आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा त्यांनी दिला.