नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला उत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार हल्ले केले आहेत. यामध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. धर्म विचारुन पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या क्रूर हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला कसं उत्तर देणार? याकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. भारताने पाकिस्तानच्या बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चक अमरु, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
भारतानं पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला. यामध्ये पाकिस्तानमधून कारवाया करणारे लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने हा हल्ला केला. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतानं हा हवाई हल्ला केला असून त्यात भारताने कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करून भारतानने जगासमोर आदर्श ठेवल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
आज मॉक ड्रीलची घोषणा देशभरात करण्यात आली होती. त्या रात्रीच १ वाजून ४४ मिनिटांनी भारताने लक्ष्यपूर्वक हल्ले करत पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले करत ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले. ज्या ठिकाणावरुन भारताविरोधात दहशतवादी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली. त्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. रात्री १ वाजून ४४ वाजता हा स्ट्राईक करण्यात आला.