पुणे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था १९७५ साली स्थापन केली. कै. वसंतदादा पाटील यांच्यानंतर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटचे ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ ‘व्हीएसआय’ असे नामकरण करण्यात आले. गेल्या २५ वर्षांपासून श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम अत्यंत जोमाने व दूरदृष्टीने सुरु आहे. या संस्थेत साखर कारखानदारी आणि तत्संबंधी उपपदार्थ या संबंधीचे सर्व प्रकारचे शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक कार्य करण्यात येते. ऊस शेती व साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असलेली शेतकऱ्यांनी स्थापन केलेली जगातील ही एकमेव संस्था आहे.
संशोधन व विकास (Research & Development), सल्ला सेवा (Consultancy Services) आणि प्रशिक्षण व विस्तार (Training & Extension) या तीन माध्यमांद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर कारखान्यांना नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करून त्यांच्या सामाजिक व आर्थिक दर्जात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य ‘व्हीएसआय’ अविरतपणे करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी स्थापित केलेली ही संस्था ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर चालते.
‘व्हीएसआय’मार्फत मनुष्यबळ विकासासाठी दरवर्षी निरनिराळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून कार्यशाळा, चर्चासत्रे आणि मेळावे आयोजित करण्यात येतात. या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे संस्था, ऊस उत्पादक शेतकरी व कारखाने यांच्यात साधला जाणारा सुसंवाद. ‘व्हीएसआय’मध्ये १९८१ पासून विविध प्रकारचे नियमित आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम घेण्यात येतात. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आणि परदेशातील विद्यार्थी तसेच साखर कारखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी प्रवेश घेतात.
‘व्हीएसआय’चे नियमित अभ्यासक्रम आतापर्यंत ९६२० विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले आहेत व अल्पमुदतीचे अभ्यासक्रम आतापर्यंत ६२५४ विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेले आहेत. ‘व्हीएसआय’ने परदेशातील साखर कारखान्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संकिर्ण (Tailor-made) शिक्षण व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखून प्रत्यक्ष कारखान्यावर (On-site) प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. परदेशातील कारखान्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘व्हीएसआय’मध्ये संकिर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
असे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी कारखान्यातील कामात प्राविण्य अवगत करून ते भारतातील व परदेशातील साखर कारखान्यांमध्ये उत्तम कामगिरी करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या सुचनेवरून १२ ते १४ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेला जोडून माजी विद्याथ्यांचा मेळावा दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी देशाभरातून माजी विद्यार्थी येणार आहेत. या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी संकेतस्थळाची लिंक देण्यात आलेली आहे. https://vsisugar.com/electronic _computer/alumni.php सदर लिंक वरून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरु आहे. या मेळाव्यास श्री. शरदचंद्रजी पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील मार्गदर्शन करणार आहेत.


















