कोल्हापूर : जिल्ह्यात हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. राधानगरी तालुक्याच्या पश्चिम तुळशी धामणी परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वळीव पावसाने हुमणी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुका कृषी विभागाच्या वतीने हुमणी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांची दोन ठिकाणी प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच २० शेतकऱ्यांना प्रकाश सापळ्यांचे वितरण केले.
राधानगरी तालुका कृषी विभागाच्या वतीने धामोड व चांदे येते हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. सहायक कृषी अधिकारी उमेश नाधवडेकर यांनी हुमणी किडीवर नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून मेटारायझिम ईपीएनसारख्या जैविक औषधाचा शेतीमध्ये वापर होणे अनिवार्य असल्याचे सांगितले.
तुळशी धामणी परिसरात सध्या वळवाचा पाऊस झाला आहे. अशा काळात हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस, भुईमूग, भात यांसारख्या इतर पिकांची मुळे खाऊन पिकांचे मोठे नुकसान करणाऱ्या हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ हा एकमेव उपाय आहे. हुमणी कीड नियंत्रक प्रकाश सापळ्यांचे प्रात्यक्षिक उमेश नाधवडेकर यांनी करून दाखविले. यावेळी रघुनाथ दामुगडे, विलास धनवडे, रवींद्र नलवडे, कुलदीप नलवडे, कृष्णात तेली, कृष्णात पाटील, संदीप फडके, शंकर भिसे, नामदेव भिसे, पांडुरंग रोगे, पंढरीनाथ पाटील, राजू टिपुगडे उपस्थित होते.