पाकिस्तानवर ७५ वर्षातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाची टांगती तलवार आहे. देशातील परकीय चलन कमी अल्याने देशाला इतरांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. या आर्थिक संकटाचा परिणाम देशातील विविध सेक्टरवर दिसू लागला आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या कापड उद्योगावर संक्रांत आली आहे. हा उद्योग देशात कोट्यवधी लोकांना रोजगार देतो. आता या उद्योगातील लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन पाकिस्तानचे महासचिव नासीर मन्सूर यांनी सांगितले की, आर्थिक मंदीचा कापड उद्योगावर विपरित परिणाम शक्य आहे. जवळपास १० लाख लोकांच्या नोकऱ्या जावू शकतात. द न्यूज इंटरनॅशनल या वेबसाइटच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी कापड निर्यातीत १४.८ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. अशा स्थितीत अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील. कापड उद्योगात मजुरांची संख्या जास्त आहे. त्यांना सरकारी मदतीशिवाय आपले जीवन चालवणे कठीण होणार आहे.















