इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनच्या (यूएससी) माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या गव्हाचा आटा, साखर, तुपाच्या किमतींमध्ये २५ ते ६२ टक्के वाढ केली आहे. तत्काळ प्रभावाने ही वाढ लागू केली आहे. याबाबत डॉन वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, बेनझीर उत्पन्न समर्थन कार्यक्रमाच्या (बीआयएसपी) लाभार्थ्यांना मूल्य वाढीतून सुट दिली जाईल. तर युएससीच्या अनुदानीत खरेदीसाठीची मर्यादा घटविण्यात आली आहे.
युएससीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवे दर अधिसूचित केले आहेत. देशाच्या कॅबिनेटने पंतप्रधान मदत पॅकेजच्या लक्ष्यित आणि लक्ष्यित नसलेल्या घटकांना समावेश करणाऱ्या अनुदानासाठीच्या एका हायब्रिड मॉडेलला मंजुरी देण्यासाठी अर्थमंत्री इशाक दार यांची शिफारस मंजूर केली आहे. नव्या दराअंतर्गत साखर प्रती किलो ७० रुपयांवरून वाढवून ८९ रुपये प्रती किलो करण्यात आली आहे.
मात्र, अनुदानाचा दुरुपयोग टाळण्यासाठी त्यांची मासिक खरेदी क्षमता मर्यादित करण्यात आली आहे. पीएमटी ३२ च्या अंतर्गत बीआयएसपी लाभार्थ्यांना दरमहा जास्तीत जास्त ४० किलो गव्हाचा आटा, पाच किलो तांदूळ आणि ५ किलो तूप खरेदी करण्याची परवानगी दिली जाईल. डॉनमधील वृत्तामध्ये म्हटले आहे की, इतर सर्व यूएससी ग्राहकांना आता गव्हाचा आटा ६४८ रुपये प्रती १० किलो बॅग आणि तांदूळ व साखर अनुक्रमे ३७५ रुपये आणि ८९ रुपये प्रती किलो दराने उपलब्ध होईल. या ग्राहकांना मासिक खरेदीची मर्यादा असेल. त्यांना दर महिन्याला २० किलो आटा, ३ रुपये प्रती किलो साखर तसेच तुपाची मर्यादा असेल. यापूर्वी त्यांना ४० किलो आटा आणि ५ किलो तूप, साखर दिली जात होती.















