एलपीजीचे पॅनिक बुकिंग झाले कमी; देशभर पुरेसा साठा उपलब्ध : केंद्र सरकार

नवी दिल्ली: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, एलपीजी सिलिंडरची घाबरून (पॅनिक) बुकिंग मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुरुवारी फक्त ५५ लाख बुकिंगची नोंद झाली. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅससह अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यासाठी सरकारने आज आंतर-मंत्रालयीय बैठक घेतली.या बैठकीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी एलपीजी स्थितीत सुधारणा झाल्याचे सांगितले. “आता पॅनिक बुकिंग नाही. काल फक्त ५५ लाख एलपीजी बुकिंग झाली,” असे त्या म्हणाल्या.

ग्राहकांना दिलासा देताना त्यांनी सांगितले की, देशभरात पुरवठ्याची कोणतीही कमतरता नाही. “पुरेसा साठा उपलब्ध आहे, कोणतेही वितरण केंद्र रिकामे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.तथापि, एलपीजीचा मुद्दा अजूनही चिंताजनक आहे, असे त्यांनी नमूद केले. ग्राहकांच्या वर्तनातील बदलाबाबत त्यांनी सांगितले की अनेकजण पाइपद्वारे गॅस (PNG) वापराकडे वळत आहेत. ७.५ लाख एलपीजी ग्राहक PNG कडे वळल्याचे त्यांनी सांगितले. ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय निरीक्षण समित्या स्थापन केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

अनियमितता रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. काल देशभरात ४५०० छापे टाकण्यात आले, त्यात उत्तर प्रदेशात ११०० छापे होते,असे त्यांनी सांगितले. तसेच, तेल विपणन कंपन्यांनी १८०० अचानक तपासण्या केल्या, असेही त्यांनी नमूद केले. जनतेला आवाहन करताना त्यांनी योग्य वितरण पद्धतीचे पालन करण्यास सांगितले. “एलपीजी सिलिंडरच्या घरपोच वितरण प्रणालीचे पालन करा,असे त्यांनी आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here