परभणी : सेलू तालुक्यातील आडगाव (दराडे) येथील श्री तुळजा भवानी साखर कारखान्याने उसाला प्रतिटन तीन हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. खासदार संजय जाधव यांनी कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालकांना ऊस दर मागणीचे पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे कि, गेल्या काही वर्षांपासून आपण शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन कमी दर देत आहात. विशेष म्हणजे राज्यातील अनेक कारखाने उसाला प्रतिटन तीन हजार सातशे रुपये व त्यापेक्षा जास्त दर देत असताना आपण मात्र दोन ते अडीच हजार रुपये दरम्यान दर देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची लूट करीत आहात, असा दावा केला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे कि, वाढती महागाई लक्षात घेता आपण उसाला देत असलेला भाव हा शेतकऱ्यांना कोणत्याच दृष्टीने पडवडणारा नाही. परिणामी ऊस उत्पादक शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडत आहेत. तरी आपण या वर्षीच्या हंगामापासून उसाला प्रतिटन किमान तीन हजार रुपये दर द्यावा. या शिवाय शासनाच्या एफआरपी धोरणानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करावा व दर तात्काळ घोषित करावा, अन्यथा आपल्या कारखान्यासमोर शिवसेना (यूबीटी) पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही खासदार जाधव यांनी दिला आहे. पत्रावर जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख कृष्णा राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


















