परभणी : गंगाखेड-परभणी राष्ट्रीय महामार्गावरील खळी पाटी (ता.गंगाखेड) येथे ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. कृती समितीने केलेल्या आंदोलनाची गंभीर दखल घेत बीड जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने, तसेच परभणी जिल्ह्यातील सायखेडा (ता. सोनपेठ) येथील साखर कारखाना यांनी ऊस दर जाहीर करत ऊस उत्पादकांना दिलासा दिला. तशाच पद्धतीने गंगाखेड येथील जी ७ साखर कारखान्याने सुरू गाळप हंगामातील उसाला प्रतिटन ३,००० रुपये पहिली उचल द्यावी आणि प्रतिटन ४,००० रुपये अंतिम भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे कॉम्रेड राजन क्षीरसागर, ॲड. अजय बुरांडे, श्रीकांत भोसले, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा भोसले आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. त्यांनी सांगितले की, वाढती महागाई, खते व निविष्ठा दरवाढ यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे जी-७ साखर कारखान्यानेदेखील उसाला किमान प्रति टन ३००० रुपये एकरकमी पहिली उचल, तसेच प्रतिटन ४००० रुपये अंतिम दर देण्यात यावा.

















