कोल्हापूर : राज्यातील सर्व साखर कारखानदार व केंद्र शासन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहेत. ऊस उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. साखर कारखानदारांना साखर व उपपदार्थापासून मोठ्या प्रमाणात नफा झाला असताना नफ्यातील वाटा देण्याची भूमिका नसल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आला आहे. गेल्या वर्षी गाळपास झालेल्या उसाचे, अंतिम बिल दिल्याशिवाय आणि चालू गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांना परवडेल असा दर जाहीर केल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
युवा गरजवंत ऊस उत्पादक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश यांच्या वतीने ऊस दराच्या मागणीसाठी शिरोळ तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेट्टी बोलत होते. येथील छत्रपती शिवाजी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरून शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा आला. या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
शेट्टी म्हणाले, संगनमत करून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याच्या दृष्टीनेच ३४०० रुपये दर जाहीर केला आहे. तो आम्हाला मान्य नाही. वर्षभरात साखरेलाही दर चांगला आहे. उपपदार्थातूनही चांगले उत्पन्न मिळाले आहे. मिळालेल्या नफ्यातून शेतकऱ्यांचा हिस्सा देणे बंधनकारक आहे. गत हंगामातील गाळप झालेल्या उसाला २०० रुपयांचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय आणि यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाचा दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही. शासनाने ऊस दराचा प्रश्न तत्काळ सोडवावा; अन्यथा आमची रस्त्यावरची लढाई करण्याची तयारी आहे.
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, साखर कारखानदारांनी दंडूकशाहीने ऊस आणण्यासाठी प्रयत्न केले आणि कोण म्हणत असेल, हलगी लावून ऊस आणतो. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी चौकात ठाण मांडून बसणार आहोत. शिरोळ तालुक्यातील विस्तव विझला आहे, अशी भावना कोणी करून घेत असेल, तर केवळ या विस्तवावरील थोडीशी राख विझली आहे. यामुळे कारखानदारांनी दराचा तोडगा तत्काळ काढावा; अन्यथा होणाऱ्या परिणामास कारखानदार जबाबदार राहतील.
‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले, साखर कारखानदार दंडूकशाही करून कारखाने सुरू करत आहेत. घोडावत खांडसरी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चालवण्यास घेतली आहे. ऊस दराचा तोडगा निघत नाही तोपर्यंत घोडावत खांडसरी बंद ठेवावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, युवा गरजवंत ऊस उत्पादक संघटनेचे यशवंत देसाई, आंदोलन अंकुशचे जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना दिले. हेळकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.









