सलग दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ५८ पैसे आणि डिझेल ३५ पैशांनी महागले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १०७.९४ रुपये प्रती लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे.
देशातील अनेक राज्यात आधीच पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे. तर मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोलच्या दराचा भडका उडाल्याचे दिसत आहे. सर्वाधिक दराने पेट्रोल विक्री होत असल्याची स्थिती येथे आहे. बालाघाटमध्ये पेट्रोल १२० रुपयापर्यंत पोहोचले आहे. पेट्रोल ११८.९८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०८.२० रुपये प्रती लिटरने मिळत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींनी जनतेला हैराण केले आहे.
दरम्यान, या वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस १ नोव्हेंबरपासून आंदोलन करणार आहे. १४-२९ नोव्हेंबर या काळात ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या आणि बेरोजगारीच्या विरोधात अभियान चालवले जाईल. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि दिनेश गुंडू राव यांनी ही माहिती दिली.


















