नवी दिल्ली : तेल वितरण कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच आहे. बुधवारी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५-२५ पैसे प्रती लिटर वाढ झाली. या वाढीनंतर भोपाळमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर पोहोचला.
खरेतर भोपाळमध्ये यापूर्वीच प्रिमियम पेट्रोल १०० रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी विक्री केली जात आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ९२ रुपयांवर पोहोचले आहे. पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दोन महिने तेल कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. मात्र, विधानसभा निवडणूक संपल्यावर आता तेल कंपन्यांना दरवाढीस मुभा मिळाल्याची स्थिती आहे. गेल्या आठवड्यात मंगळवारीही तेल कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया आजही सुरूच आहे.
प्रमुख शहरांतील दर
आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल ९२.०५ रुपये तर डिझेल ८२.६१ रुपये लिटरवर पोहोचले. अशाच पद्धतीने मुंबईत पेट्रोल ९८.३६ रुपये आणि डिझेल ८९.७५ रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ८२.६१ तर डिझेल ८७.४९ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ९२.१६ रुपये तर डिझेल ८५.४५ रुपये लिटर झाले आहे. भोपाळमध्ये पेट्रोल १००.०८ रुपये आणि डिझेल ९०.९५ रुपये लिटर दराने विक्री सुरू आहे.
पेट्रोलमध्ये ५.५ रुपयांची दरवाढ शक्य
क्रेडिट सुईस कंपनीने पेट्रोलचे दर ५.५ रुपये प्रती लिटर वाढण्याची शक्यता यापूर्वी वर्तविली होती. क्रेडिट सुईसच्या एका अहवालानुसार, तेल कंपन्यांनी जर मार्जिन दुरुस्तीसाठी अथवा आपला तोटा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर पेट्रोलचे दर ५.५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ३ रुपये प्रती लिटर वाढू शकतात. गेल्या आठवडाभरात पेट्रोल १.६८ रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वधारल्याचे दिसले आहे. तर भारतीय उपखंडासाठी येणाऱ्या कच्च्या तेलाचे दर सुमारे २५ दिवसांपूर्वीचे आहेत.














