नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर ४ महिन्यांच्या अंतराने २-२ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ हप्ते जमा झाले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात १३ व्या हफ्ता जमा झाल्याची चांगली बातमी या आठवड्यातच येऊ शकते.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांना आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तपासता येईल. यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करा. येथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. प्रथम ई-केवायसी आणि जमिनीचे तपशील येथे पूर्णपणे भरलेले आहेत का हे तपासा. जर पीएम किसान योजनेच्या स्टेटसच्या पुढे होय लिहिले असेल तर समजा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल. जर, यापैकी कोणत्याही ठिकाणी ‘नाही’ लिहिलेले असेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. तसे घडू नये यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी.














