नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिजीचे पंतप्रधान सितेनी राबुका भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान राबुका यांचा सध्याचे पद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, फिजीचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मंत्री अँटोनियो लालाबालावू आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आहे. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी फिजीच्या साखर उद्योगाला भारताच्या पाठिंब्याची घोषणा केली. यामध्ये भारताच्या अनुदान सहाय्य कार्यक्रमांतर्गत १२ कृषी ड्रोन आणि दोन फिरत्या माती चाचणी प्रयोगशाळांची भेट समाविष्ट आहे.
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राबुका आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय मुद्द्यांवर तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक, जागतिक बाबींवर व्यापक, दूरदर्शी चर्चा केली. संरक्षण, आरोग्य, शेती, कृषी प्रक्रिया, व्यापार आणि गुंतवणूक, लघु आणि मध्यम उद्योग विकास, सहकारी संस्था, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात व्यापक, समावेशक आणि दूरदर्शी भागीदारी निर्माण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (आयटीईसी) कार्यक्रमांतर्गत फिजीच्या सरकारी व्यावसायिकांना क्षमता निर्मितीच्या संधी प्रदान करत राहील. पंतप्रधान मोदींनी भारताच्या अनुदान सहाय्य कार्यक्रमांतर्गत १२ कृषी ड्रोन आणि २ मोबाइल माती चाचणी प्रयोगशाळा फिजीला भेट देण्याची घोषणा केली. त्यामुळे फिजीच्या साखर क्षेत्रात नवोपक्रमाला चालना मिळेल आणि उत्पादकता वाढेल. या क्षेत्राला अधिक पाठिंबा देण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी फिजी शुगर कॉर्पोरेशनमध्ये एक आयटीईसी तज्ज्ञ पाठविण्याचा तसेच फिजीच्या साखर क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी विशेष आयटीईसी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचा इरादा जाहीर केला.
भारताच्या मिशन लाइफ आणि ब्लू पॅसिफिक खंडासाठी २०५० च्या धोरणाच्या अनुषंगाने नेत्यांनी हवामान कृती, लवचिकता निर्माण आणि शाश्वत विकासासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए), आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी कोअॅलिशन (सीडीआरआय) आणि ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स (जीबीए) मध्ये फिजीच्या सदस्यत्वाचे कौतुक केले. नेत्यांनी आयएसए अंतर्गत वाढत्या सहकार्याचे स्वागत केले. यामध्ये ‘आयएसए’सोबत त्रिपक्षीय सामंजस्य कराराद्वारे फिजी राष्ट्रीय विद्यापीठात स्टार -सेंटरची स्थापना आणि फिजीमधील प्राधान्य क्षेत्रांमध्ये सौर ऊर्जा उपयोजन वाढवण्यासाठी देश भागीदारी फ्रेमवर्कवर स्वाक्षरी यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी तांत्रिक सहाय्य, क्षमता निर्माण आणि जागतिक व्यासपीठांवर वकिलीद्वारे सीडीआरआय चौकटीत फिजीच्या राष्ट्रीय लवचिकता उद्दिष्टांना पाठिंबा देण्याची भारताची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.
ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स (जीबीए) च्या चौकटीत शाश्वत ऊर्जा उपाय म्हणून जैवइंधनांना प्रोत्साहन देण्याची त्यांची सामायिक वचनबद्धता नेत्यांनी पुन्हा व्यक्त केली. आघाडीचे संस्थापक आणि सक्रिय सदस्य म्हणून, दोन्ही बाजूंनी ऊर्जा सुरक्षा वाढवणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि समावेशक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला. फिजीमध्ये शाश्वत जैवइंधन उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी क्षमता बांधणी, तांत्रिक सहाय्य आणि धोरणात्मक चौकटींवर सहकार्य मजबूत करण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.