लखनौ / पुणे : उत्तर प्रदेशात आगामी गाळप हंगामाची तयारी जोरात सुरु असली तरी भरभराटीला आलेले ऊस पीक पुन्हा धोकादायक आजाराच्या विळख्यात सापडले आहे. पावसानंतर तीव्र सूर्यप्रकाश आणि वाढत्या आर्द्रतेमुळे पोक्का बोईंग (Pokkah Boeng) नावाचा बुरशीजन्य रोग वेगाने पसरू लागला आहे. उसावर डाग पडत आहेत. पाने कोमेजत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. किटकनाशके, औषधांच्या मदतीने शेतकरी पीक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला. त्यानंतर मान्सूनच्या पावसानंतर हवामानातील आर्द्रतेमुळे पोक्का बोईंग रोगाचा फैलाव वाढला आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी सध्या खोडवा उसावर या पांढरी माशी (Whitefly) किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. देशातील ऊस आणि साखर उत्पादनात अग्रणी असलेल्या दोन राज्यातील या किडीचा वेळीच प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
उत्तर प्रदेशात फ्युसेरियम नावाच्या बुरशीमुळे होणारा हा रोग हवेतून शेतात वेगाने पसरत आहे. उसाची वरची आणि खालची पाने आकुंचन पावू लागली आहेत. काही ठिकाणी ती कुजत आहेत. जर या रोगाचे वेळीच नियंत्रण केले नाही तर पीक उत्पादनात घट होऊ शकते. याबाबत, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद कुमार म्हणाले की, हा बुरशीजन्य रोग आहे. याची लक्षणे दिसताच शेतकऱ्यांना रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कार्बडायझम ५० डब्ल्यूपी ४०० ग्रॅम प्रती एकर २०० लिटर पाण्यात विरघळवून फवारणी करावी. किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ८०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कृषी तज्ज्ञांच्या मते, हा रोग वेगाने पसरतो आणि सुरुवातीलाच तो थांबवला नाही तर संपूर्ण पिकावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, सतत शेताचे निरीक्षण करावे आणि योग्य औषध वेळेवर वापरावे.
पांढरी माशी किडीचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान
महाराष्ट्रात काही ठिकाणी सध्या खोडवा उसावर या पांढरी माशी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना ऊस उत्पन्नात मोठी घट झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून खालीलप्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात. उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल. प्रादुर्भाव असल्यास कीटकनाशके फवारावी. मात्र, लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये असा सल्ला लखनौ येथील केंद्रीय ऊस संशोधन संस्था आणि पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने दिला आहे.
याबाबत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. जी. डी. गडदे आणि एम. बी. मांडगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या उसावर पांढरी माशी जुलै-ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात आढळते, म्हणून उसाची लागवड किंवा तोड उशिरा करू नये. पांढऱ्या माशीने प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. उसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे. नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा. पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. लिकॅनीसिलियम लिकॅनी या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली किंवा ॲसीफेट ७५% २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमिडाक्लोपीड १७.८% कीटकनाशकासोबत २ टक्के युरिया (२०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) मिसळून फवारणी केल्यास किडींच्या कोषामध्ये कीटकनाशकाचा प्रवेश चांगल्याप्रकारे होतो व त्यामुळे किडीचे अधिक चांगले व्यवस्थापन होते.