नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या माझ्या निर्णयामुळे नाराज झालेली एक शक्तिशाली लॉबी आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात होते. काही लोकांच्या व्यवसायांना या निर्णयाचा फटका बसला आणि ते माझी बदनामी करू लागते आहेत असे सांगत, भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल मिश्रणाबाबत आपल्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळले. मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदार मला घाबरतात, असेही ते म्हणाले.
मंत्री गडकरी म्हणाले की, मी अशा टीकेला उत्तर देत नाही. याकडे दुर्लक्ष करणे चांगले. त्यांचे धोरण इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे यावर केंद्रित आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे इंधन आयातीत निहित हितसंबंध असलेल्यांना थेट नुकसान झाले असा दावा गडकरी यांनी केला. कच्च्या तेलाच्या आयातीतून देशातून सुमारे २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काही लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला. लोकांना सत्य माहिती आहे आणि यापूर्वीही मी अशा परिस्थितींचा सामना केलेला आहे. विश्लेषकांच्या मते, सीआयएएन अॅग्रोची वाढ ही केवळ इथेनॉल विक्रीमुळेच नव्हे, तर नव्या व्यवसाय आणि इतर उत्पन्न स्रोतांमुळेही झाली आहे. गडकरी यांचे पुत्र निखिल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या सीआयएएन अॅग्रो इंडस्ट्रीजच्या महसुलात आणि नफ्यात झालेल्या तीव्र वाढीबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.