पुणे : राज्यात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता सहकारी आणि खासगी कारखान्यांची संख्या पन्नास -पन्नास टक्क्यांवर गेली आहे. सहकारी कारखाने टिकावेत ही सहकारी क्षेत्रात कार्यरत लोकांचीच इच्छा आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. शुक्रवारी (दि. २१) शेट्टी यांनी येथील कृषी विज्ञान केंद्रावर जात एआय तंत्रज्ञानाद्वारे केली जाणारी ऊस शेतीची पाहणी केली.
शेट्टी म्हणाले की, एआयमुळे उत्पादन खर्च कमी होत असेल आणि उत्पन्नात वाढ होत असेल तर ते चांगले आहे. आम्ही नेहमीच तंत्रज्ञानाच्या बाजूने उभे राहिलो आहोत. आमचा तंत्रज्ञानाला विरोध नाही. पण, हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडणारे पाहिजे. दरम्यान, राज्य शासनाने घेतलेला एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द करत उसाची एफआरपी एकरकमी द्यावी, असा निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्तांना पत्र लिहिले आहे. एकरकमी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे.


















