पुणे : जिल्ह्यात सद्य:स्थितीत यंदाच्या गाळप हंगामात सहभागी असलेल्या १५ साखर कारखान्यांपैकी ११ कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. सध्या चार साखर कारखाने सुरू असून आतापर्यंत १ कोटी १५ लाख ११ हजार ९७१ मे. टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. यंदाच्या हंगामात १ कोटी ६७ लाख मेट्रिक टनापर्यंत ऊस गाळप होईल असा अंदाज होता. त्यामुळे ५० लाख मेट्रिक टन गाळप कमी झाल्याचे चित्र आहे. सध्या बारामती अॅग्रो, माळेगाव सहकारी, श्री सोमेश्वर सहकारी आणि भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स या चार कारखान्यांचे ऊस गाळप सुरू असल्याचे दिसून येत आहे.
साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, बारामती ॲग्रो लिमिटेडने सर्वाधिक १७ लाख ५४ हजार ४२९ मे. टन ऊस गाळप करून १५ लाख ३९ हजार ४५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर दौंड शुगर या खासगी कारखान्याने १५ लाख १७ हजार २२९ मे.टन ऊस गाळप करून १२ लाख १४ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ११ लाख ९३ हजार ४१६ मे. टन ऊस गाळप पूर्ण करून १४ लाख ७ हजार ९५० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याचा साखर उतारा ११.८० टक्के असून तो सर्वाधिक आहे. यंदा गाळप हंगाम उशिरा सुरू झाला आणि ऊस वजनातही घट झाल्याचे सांगण्यात आले.


















