पुणे : १० लाख ८९ हजार टन उसाचे गाळप करून माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गेल्या १२७ दिवसांच्या चालू गाळप हंगामात १० लाख ८९ हजार ६८३ टन उसाचे गाळप केले असून कारखान्याने १२ लाख ७७ हजार १०० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याला सरासरी १२.२८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी ही माहिती दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर कारखान्याच्या उपाध्यक्षा संगीता कोकरे व सर्व संचालक मंडळाने कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडला.

माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या हातात घेतली आहे. हंगामात कारखान्याने सभासदांच्या ७ लाख ३४ हजार १८४ टन तर गेटकेनच्या ३ लाख ५५ हजार ४९९ टन उसाचे गाळप केले. कारखान्याने ५ कोटी २४ लाख २० हजार ४४० वीज युनिटची निर्मिती करून २ कोटी ९४ लाख ३७ हजार २०० वीज युनिटची विक्री केली. कारखान्याने २४ हजार ५५५ टन बी हेवी मोलॅसिसचे आणि २५ हजार ५६२ टन सी हेवी मोलॅसिसचे उत्पादन घेतल्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी सांगितले. उपाध्यक्षा संगीताताई कोकरे यांनी सांगितले की, माळेगाव कारखान्याला राज्यातील नामांकित पहिल्या पाच कारखान्यांमध्ये ठेवण्याचे दादांचे स्वप्न होते. ते लक्षात ठेवून संचालक, अधिकारी, कामगार व सभासदांच्या सहकार्याने या हंगामाची यशस्वीरीत्या सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here