पुणे : श्री छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सुमारे ६०० हून अधिक अर्ज दाखल झाले होते. या दाखल उमेदवारी अर्जांपैकी सुमारे ११५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर सुमारे ४८५ अर्ज वैध ठरले आहेत. याबाबत गुरुवारी अधिकृत माहिती जारी करण्यात येणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची इतिहासातील ही पहिली वेळ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २ मे पर्यंत आहे. आता २ मे पर्यंत काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती कारखान्याच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत ६०० पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची छाननी बुधवारी करण्यात आली. यापैकी ११५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. उर्वरीत ४८५ उमेदवार सध्यातरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सकाळी ११.३० वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी तयार करण्याचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत वैध-अवैध उमेदवारांची यादी तयार होणार आहे.











