पुणे : राज्यातील प्रत्येक कारखान्यावर पाच-सहा महिन्यांसाठी ऊसतोड मजूर स्थलांतरित होऊन येतात. मूळ गावी शाळेत असलेली त्यांची मुले स्थलांतरानंतर शाळेबाहेर ढकलली जातात. या वंचित मुलामुलींना शिक्षण देण्याचा वसा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने जपला आहे. कारखान्याने पाच वर्षांपूर्वी, २०२१-२२ मध्ये ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी ‘कोपीवरची शाळा’ हा अभ्यासवर्ग सुरू केला. या अभ्यासवर्गातून आतापर्यंत २,३१२ मुलांना लिहिते-वाचते करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारखान्याने चालविलेला हा राज्यातील पहिला उपक्रम असून इथे मुले तर शिकतच आहेत पण ऊसतोड मजुरांनाही कारखान्याबद्दल आत्मीयता वाटू लागली आहे. आणि शैक्षणिक साहित्याच्या रूपाने लोकसहभागही मिळत आहे. चालू हंगामात केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयोगटाची ४८१ मुले तर ६ ते १४ वयोगटातील २२५ मुले आढळली.
या मुलांची प्राथमिक चाचणी घेतली असता पूर्वतयारीत ९९, मुळाक्षरांत ८५, बाराखडीत जोडाक्षरांत १९ तर समजपूर्वक वाचनात १२ मुले आढळली. तर तीन विशेष मुले आहेत अशी माहिती नौशाद बागवान यांनी दिली. कारखान्याने नौशाद बागवान, संभाजी खोमणे आरती गवळी, अश्विनी लोखंडे, अनिता ओव्हाळ, संतोष होनमाने, नितीन मोरे या सात संवेदनशील शिक्षक-कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे. सातही जण मनापासून रोज सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत सात अभ्यासवर्ग चालवतात. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी सांगितले की, या शालेय मुलांना शिक्षण देतानाच सोबतीला दर आठवड्याला ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम राबवून खेळ, गाणी, कला घेतल्या जातात. तसेच ० ते ६ वयोगटाचे सर्वेक्षण करून त्यांची यादी आरोग्य व अंगणवाडी विभागाला दिली आहे. त्यांनी सर्व मुलांचे लसीकरण केले आहे. ऊस तोडण्यासाठी सात गर्भवती माता आल्या आहेत. त्यांना आरोग्य केंद्राशी जोडून प्रसूतीपर्यंतची काळजी घेतली जाते.

















