पुणे : दौंड तालुक्यात यंदाचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत आटोपल्याने तालुक्यातील सर्व प्रमुख कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. यंदा कारखाने सरासरी अवघे ९९ दिवस चालले. एमआरएन भीमा – पाटस सहकारी साखर कारखाना, दौंड साखर कारखाना आलेगाव, श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना पाटेठाण आणि ओएसजी हरित ऊर्जा साखर कारखाना यवत या चार कारखान्यांनी मिळून एकूण २६ लाख १२ हजार ९२२ मे. टन ऊस गाळप केले. यंदाचे उत्पादन समाधानकारक असले तरी हंगामाचा घटता कालावधी चिंतेचा विषय ठरत आहे. पूर्वी पाच ते सहा महिने सुरू राहणारा गाळप हंगाम आता ४ ते ५ महिन्यांतच आटपत आहे, याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
एमआरएन भीमा पाटस सहकारी साखर कारखाना या कारखान्याने ६ लाख ५० हजार ८३ मे. टन ऊस गाळप केला. त्यातून ६ लाख ६४ हजार साखरेची पोती तयार झाली असून, ११.७७ टक्के साखर उतारा नोंदविण्यात आला. दौंड साखर कारखाना आलेगावने तालुक्यात सर्वाधिक गाळपाची नोंद केली. १५ लाख २ हजार १६० मे. टन ऊस गाळपातून ११ लाख ९२ हजार ८०० साखरेचे उत्पादन घेतले. कारखान्याने ११.३४ टक्के साखर उताऱ्यासह उत्पादन टिकवून ठेवले. श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना पाटेठाणने ४ लाख ३० हजार ७९ मे. टन ऊस गाळपातून ३ लाख १४ हजार ६५९ साखरेची पोती तयार केली. ११.६५ टक्के साखर उताऱ्यासह चांगली कामगिरी नोंदवली. तर ओएसजी हरित ऊर्जा साखर कारखान्याने ३० हजार ७०० मे. टन ऊस गाळप करून सुमारे २४ हजार साखरेची पोती तयार झाली.


















