पुणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील २७ ऊस तोड कामगारांना एका जमीन मालकाने माधवनगर (ता. दौंड) येथे डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबात अहिल्यानगर येथून तक्रार दाखल होताच, जिल्हा विधी सेवा समिती व पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या कामगारांची सुटका करण्यात आली. जमीनमालक हिरामण गणपत गाढवे याने या कामगारांना मारहाण करून डांबून ठेवल्याची तक्रार करण्यात आली होती. याची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पोलिस यंत्रणा, कामगार आयुक्त कार्यालयाच्या पथकाने कारवाई करत ऊसतोड कामगारांची सुटका केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी येथील नाना जाधव यांनी तक्रार केली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत २७ ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात आले. जमीनमालक हिरामण गणपत गाढवे याच्याविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. जिल्हा विधी सेवा समितीच्या वतीने अॅड. देवभक्त महापुरे, अॅड. सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांनी मंडल अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलिसांनी कारवाई केली.












