पुणे : जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी परंपरेने बीड, अहिल्यानगर आदी भागांतील मजूर मोठ्या संख्येने येतात. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून ऊसतोड मजुरांची संख्या घटत चालली आहे. याचा थेट परिणाम ऊसतोडीवर होत असल्याने कारखान्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हार्वेस्टर मशीनचा पर्याय स्वीकारला आहे. छत्रपती, माळेगाव व सोमेश्वर कारखान्यांसाठी चालू हंगामात २८ हार्वेस्टर मशीनविक्री झाली आहेत. हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोड केल्यास कांड्या गोळा करण्यासाठी लागणारा मजुरी खर्च कमी होतो. त्याचबरोबर मशीनमधून निघणारा पालापाचोळा बारीक कुट्टी स्वरूपात शेतातच पसरतो. यामुळे सेंद्रिय खतनिर्मिती होऊन जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे पालापाचोळा पेटवण्याची गरज राहत नाही, पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत आहे.
सद्यस्थितीत छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १४ हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू आहे. ऊसतोड मशीनमुळे वेळेची बचत, खर्चात कपात आणि जमिनीच्या सुपीकतेत वाढ असा तिहेरी फायदा होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. हार्वेस्टर मशीनमुळे अवघ्या चार ते पाच तासांत एक एकर क्षेत्राची ऊसतोड पूर्ण होत आहे. मजुरांची टंचाई, वाढता खर्च आणि वेळेची बचत आणि ऊस तोडीवेळी पाचटाची कुट्टी होते. या पार्श्वभूमीवर ऊसतोड यंत्रांचा वापर वेगाने वाढत आहे. परिणामी तालुक्यात ऊसतोड हार्वेस्टर मशीनची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. काटेवाडी-सोनगाव परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर या यंत्रांचा वापर करताना दिसत आहेत. हार्वेस्टर विक्रेते विद्याधर काटे यांनी सांगितले की, हार्वेस्टर मशीनमुळे शेतकऱ्यांचा ऊसतोडीचा खर्च कमी होत असून, वेळेची मोठी बचत होत आहे. यासाठी मशीनला मोठी मागणी निर्माण झाली आहे.

















