पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कृषी विज्ञान केंद्र शारदानगर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादन वाढीकरीता (कृत्रिम बुद्धीमत्ता एआय) तंत्रज्ञान वापर करण्याबाबत चर्चासत्र व प्रात्याक्षिक झाले. आगामी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्रामधील प्राथमिक ५०० सभासदांसाठी हे एआय तंत्रज्ञान राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तंत्रज्ञानाचा प्रती हेक्टरपर्यंत करीता खर्च रुपये २५ हजार रुपये येणार आहे. त्यापैकी सहभागी सभासदाने रुपये ९ हजार रूपये भरावयाचे आहेत. सभासदाच्यावतीने कारखान्यामार्फत रुपये ६७५० रुपये जमा केले जाणार असून उर्वरित ९२५० रुपये वसंतदादा शुगर इन्स्टीट्युट, मांजरी संस्थेमार्फत दिले जाणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बुद्रुक साखर संघ व कारखाना यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करुन कारखाना कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबविणेचे ठरविण्यात आले. यावेळी ऊस उत्पादन वाढीकरीता संचालक मंडळाचे समवेत कृषि विज्ञान केंद्र शारदानगरचे तज्ज्ञ संतोष करंजे व तुषार जाधव यांनी प्रात्याक्षिक सादर करुन मार्गदर्शन केले. विद्यमान चेअरमन केशवराव जगताप यांनी कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता तसेच मर्यादित कार्यक्षेत्र याचा विचार करुन या तंत्रज्ञानाच्या वापराने कारखाना ऊस उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे, असे सांगितले. यावेळी माजी संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोक पाटील, मुख्य शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे, मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे व कारखान्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.