पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक रिंगणातील जय भवानी पॅनेल आणि विरोधातील श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आयोजित निंबोडी, लाकडी, निरगुडे व शेटफळगढे या गावांमध्ये जाहीर सभांतून जय भवानी पॅनलचे प्रमुख व कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी विरोधकांचा समाचार घेतला. काहींनी स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लादण्याचे काम केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सभासद त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असा दावा जाचक यांनी केला. यावेळी अनिल काटे, रामचंद्र निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप यांच्यासह उमेदवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर निरगुडे (ता. इंदापूर) येथे छत्रपती बचाव पॅनेलच्या प्रचारात जाहीर सभा झाली. यावेळी कारखान्याचे माजी संचालक व बचाव पॅनेलचे प्रमुख मुरलीधर निंबाळकर यांनी कोर्ट-कचेरीच्या नादामध्ये छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीत गेला. कारखान्याच्या आर्थिक विवंचनेत कोणाचा हातभार लागला आहे. हेदेखील सभासदांना चांगले माहीत झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा सभासद दाखविल्याशिवाय राहणार नाहीत,” अशी टीका केली. ते म्हणाले, “छत्रपती साखर कारखान्याच्या विस्तार वाढीचा प्रकल्प ९० ते ९५ कोटी होत असताना कोर्टकचेऱ्यांमुळे हा प्रकल्प १८० कोटीपर्यंत गेला. यामधूनच कारखान्याची आर्थिक अडचण झाली आहे. विस्तारवाढीच्या प्रकल्पासाठीच नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये सततची कोर्ट कचेरी, हे या आर्थिक अडचणीचे मुळ कारण ठरले आहे. दुसरे पॅनल प्रमुख तानाजी थोरात यांनीही जय भवानी पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक यांच्यावर टीका केली. अविनाश मोटे, पद्मजा भोसले, रविशंकर पवार, हनुमंत काजळे, पंचायत समितीचे माजी सभापती करण घोलप आदींनी मार्गदर्शन केले. अनिल भोसले यांनी सूत्रसंचालन केले. रामदास काजळे यांनी आभार मानले.