पुणे: हवेली तालुक्यातील थेऊर येथील चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना पुणे विभागाच्या प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी नोटीस बजावली आहे. हा कारखाना गेल्या १३ वर्षांपासून आर्थिक अनियमिततेमुळे बंद आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाविरुद्ध विकास लवांडे व अन्य दोन सभासदांनी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी २४ डिसेंबर रोजी सुनावणीस उपस्थित राहण्यासाठी नोटीस दिली गेली आहे.
साखर सहसंचालक नीलिमा प्रादेशिक गायकवाड यांनी दिलेल्या नोटीशीत नमूद केले आहे की, विकास लवांडे व इतरांनी आपल्या तक्रार अर्जात मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. या मुद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी स्वतः समोर हजर राहून खुलासा करावा. हा खुलासा समाधानकारक वाटला नाही किंवा आपण सुनावणीस गैरहजर राहिलात तर आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही प्रशासकीय बाब आहे. याबाबत योग्य ते खुलासा केला जाईल असे स्पष्ट केले.

















