पुणे : शेतकऱ्यांना आडसाली ऊस लागवड फायदेशीर ठरते. यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे प्रक्रियेपासून सुरुवात करणे गरजेचे आहे. बेणे प्रक्रिया ही यशस्वी पिकासाठी खरा आधार आहे. यातून रोग आणि किडींना रोखले जाते. खतांचा खर्च कमी करते आणि एकरी २० टक्के जास्त उत्पन्न देते, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. ऊस उगवणीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये नत्रयुक्त व स्फुरदयुक्त खते उपलब्ध करून देण्याचे काम हे जिवाणू करतात. याची खूप महत्त्वाची भूमिका आहे. ५० टक्के नत्र, २५ टक्के स्फुरदची मात्रा बीजप्रक्रियेमुळे कमी होते, अशी विद्यापीठाची शिफारस आहे. बेणे प्रक्रियेचे सकारात्मक परिणाम देखील दिसतात. पिकांची वाढ चांगली होते. कीड, रोग नियंत्रणासाठी जिवाणूसंवर्धक बेणे प्रक्रिया गरजेची आहे, असे ऊस तज्ज्ञ डॉ. भारत रासकर यांनी सांगितले.
याबाबत डॉ. भारत रासकर म्हणाले की, शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपूर्वी माती परीक्षण करून योग्य बेणे निवडावे आणि प्रक्रिया करावी. ही पद्धत अवलंबल्यास नुकसान टळते आणि नफा वाढतो. बेणे प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या बुरशीनाशक व कीटकनाशकांचे प्रमाण हेक्टरी व एकरी बदलत असते त्यामुळे हे प्रमाण तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे. ऊस पिकावर काणी रोग, खवले कीड आणि पिठ्या ढेकूण यांचा हल्ला होऊ शकतो. यासाठी कार्बेन्डाझिम आणि डायमिथोएट पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. यातून बेण्याची उगवण ९० टक्क्यांपर्यंत वाढते आणि काणी रोगामुळे होणारे ३० टक्क्यांपर्यंत नुकसान टळते. आडसाली ऊस लागवडीसाठी बेणे प्रक्रिया फायद्याचे असते. त्यातून रोग आणि किडींवर नियंत्रण होते. खतांची बचतही होऊन उत्पादनात वाढ होते. बेणे प्रक्रियेमुळे एकरी १०० ते १२० टन ऊस उत्पादन मिळू शकते. निरोगी बेण्यामुळे फुटव्यांची संख्या आणि कांड्यांची जाडी वाढते. ही सोपी आणि कमी खर्चाची पद्धत शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.