पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सोमवारी (ता. २४) सिम्बॉयोसीस विद्यापीठात झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी खर्च व मूल्य आयोगाचे (सीएसीपी) अध्यक्ष प्रा. विजय पॉल शर्मा उपस्थित होते. त्यांनी सरकारने उसाचे रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) जास्त वाढविल्यास देशातील साखर कारखान्यांसोबत शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते, असा दावा केला. केंद्र सरकारने शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू ठेवत सात वर्षे एफआरपी वाढवली आहे. मात्र, एफआरपी खूप वाढविल्यास साखर उद्योगातील घटकांचे नुकसान होईल. त्यामुळे आता कारखाने व शेतकरी यांचे हितसंबंध तसेच परस्परपूरक विकास जपणारा दृष्टिकोन ठेवावा लागेल, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगाचा खर्च आता प्रतिटन ५८०० रुपयांवर पोचला असून परतावा केवळ ५००० रुपयांपर्यंत आला आहे. प्रतिटन ७०० रुपये तोटा दूर करण्यासाठी साखर महासंघाने एक प्रस्ताव केंद्र शासनाला दिला आहे, असे सांगितले. यावेळी प्रा. पॉल यांनी, सतत पिके घेतल्याने जमिनी खराब होत आहेत. ऊसशेतीतील कीडरोगांमध्ये प्रतिकारक्षमता येते आहे असे सांगत ऊस शेती मधील समस्यादेखील विचारात घ्याव्या लागतील असे सांगितले. यावेळी कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, उपाध्यक्ष प्रताप ओहोळ व व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर आयुक्त डॉ.संजय कोलते, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, लेखक अच्युत गोडबोले, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे व्यासपीठावर होते.
















