पुणे : सध्याच्या वातावरणामुळे जिल्ह्यातील ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. नव्याने केलेल्या आडसाली ऊस लागवडीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मे-जून महिन्यात भुंगेऱ्यांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जुलै-नोव्हेंबर या काळात अळ्यांवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. हुमणीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच प्रभावी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
हुमणी भुंगेऱ्यांनी घातलेल्या अंड्यांमधून आता अळ्या बाहेर येत आहेत. हुमणी अळी ऊस, मका, सोयाबीन, भुईमूग यांसारख्या पिकांच्या मुळांना खाते, ज्यामुळे पिकांचे पाणी आणि अन्न शोषण थांबते. परिणामी, पाने पिवळी पडतात आणि १५-२० दिवसांत पीक पूर्णपणे वाळते. यामुळे पिकांचे ३० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते. यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते. शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून आडसाली ऊस लागवडीचे नुकसान टाळता येईल आणि दुबार लागणीची वेळ येणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर प्रभावी करून प्रतिबंधात्मक उपाय करावेत, परोपजीवी बुरशी व नैसर्गिक शत्रूंचा वापर करावा, बुरशी-आधारित नियंत्रक वापरावेत, असे आवाहन कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी के. एन. हिंगमिरे यांनी केले आहे.